Ad will apear here
Next
उगारची चैत्रगौर

     "आता येईन चैत्र मासी" असे हादग्याच्या गाण्यातून वचन दिल्याप्रमाणे चैत्रगौर चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षात तृतीयेला माहेरवाशीण म्हणून सन्मानाने यायची. ती पहिली तीज असायची. पौर्णिमेनंतर च्या तृतीयेला दुसरी तीज असे व त्यानंतर घरोघर धुमधडाक्यात हळदीकुंकू सुरू होई. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाला तिसरी तीज म्हणजे अक्षय तृतीया असते. त्यादिवशी सन्मानाने तिची पाठवणी करायची. ती येण्या अगोदर सारे घर सारवून लिंपून स्वच्छ केले जायचे. घराघरातले लाकडी, पितळी, विविध धातूंचे तिचे झोपाळे बाहेर यायचे आणि देव्हार्यावरील
 कोनाड्यात शिस्तीत बसायचे. तो कोनाडा देखील रंगवून ठेवलेला असायचा.

 त्यावर वळणदार अक्षरात लिहिलेले असायचे," श्री चैत्रगौरी प्रसन्न ".

त्या पाळण्यात बसवायची गौर म्हणजे देव्हार्‍यातली अन्नपूर्णा.( उमा " भिक्षांदेही कृपावलंबन करी , मातान्नपूर्णेश्वरी " असे म्हणून त्रैलोक्याचे स्वामी श्री शंकर महादेव यांनी तिच्यापुढे शरणागती पत्करली होती ती पार्वती).

एरवी पूजेचा मान घरातल्या पुरुषांकडे पण या चैत्रगौरीच्या पूजेचा मान बायकांकडे असायचा. आई सोवळे नेसून मोठ्या कौतुकाने तिला तेल लावून गरम पाण्याने न्हाऊ माखू घालायची. कोऱ्या कापडाने अलगद पुसायची. चांदीच्या वाटीत भरपूर तांदूळ घालून त्यात तिला स्थानापन्न करायची. छान सजवायची. नैवेद्य दाखवायची आरती करायची तिच्यापुढे रोज ताज्या पाण्याचा गडू भरून ठेवायची.

     सोयीचा  वार पाहून घरोघरी हळदी-कुंकवाचा थाट असायचा. दोन दिवस आधी फराळाचे खमंग पदार्थ करंजी शेव चिरोटे बनवायचे. दुपारी सवाष्ण
 जेवायला घालायची.

       गौरीची आरास हा एक मोठा सोहळा असायचा. आराशी साठी तीन चार पायऱ्या बहुदा घरातल्या जुन्या पत्र्याच्या डब्यांच्या असायच्या. त्यावर छान से बेडशीट घालायचे. कडेने जरीच्या साड्यांचे पडदे करायचे. वरच्या पायरीवर चांदीच्या वाटीतली अन्नपूर्णा स्थानापन्न व्हायची. बाजूला समया असायच्या. मधल्या पायऱ्यांवर फळे, खेळणी, लाडू शेव करंज्या यांची शिगोशिग भरलेली ताटे, तोतापुरी कैऱ्यांच्या तोंडाला लालभडक कुंकू लावून बनवलेले हिरवेगार पोपट, कलिंगडाची परडी किंवा कमळ आकर्षक पद्धतीने मांडलेले असायचे. खालच्या पायरीवर भरपूर वाळू पसरून त्यावर आरसा ठेवून एक उघडे बाळ ( चिनी मातीचे) पोहत असायचे. त्याच्या शेजारी दोन बाळे. पूर्वी घरात अडसरी म्हणजे दोन शेराचे मोठे माप असायचे.त्यावर कुंच्या घालून बाळं केली जायची. समोर सुरेख रांगोळी व गौरी चा नेवैद्य असायचा. त्यात आंब्याची डाळ, पन्हे, बत्तासे, काकडी व कलिंगडाच्या फोडी व भिजवलेल्या हरभऱ्याची ओटी असायची. बाजूला एका टेबलावर भरत काम केलेला टेबल क्लॉथ घालून त्यावर हळदीकुंकवाच्या कोयऱ्या, अत्तरदाणी, गुलाबदाणी, आंबा डाळीच्या वाट्या, वेलदोडे केशर मिरे घालून केलेले चुलीत भाजलेल्या  कैऱ्यांचे चवदार  पन्हयाचे पेले , भिजवलेल्या हरभऱ्याची टोपली असायची. यानिमित्ताने एकमेकींच्या गाठी पडायच्या. गप्पा व्हायच्या. सगळीकडे मांगल्य असायचे. गौरीचे हळदीकुंकू म्हणजे तिचे डोहाळजेवण असते असे आई म्हणायची. म्हणून तिला षड्रस अन्नाचा नैवेद्य दाखवायचा. आंब्याच्या डाळीला ती भरलेल्या मिरचीची फोडणी द्यायची. त्यात भरपूर हिंग मेथी असल्यामुळे कडवटपणा चा अंश त्यात उतरायचा. डाळही खमंग व्हायची.

   रात्री पुरुष मंडळींची पंगत असायची. आई मोठ्या पातेल्यात  हरभऱ्याची शेंगदाणे घालून खमंग उसळ करायची. फराळाचे जिन्नस डाळ पन्हे जोडीला सवंग गप्पा. असे हळदीकुंकू घरोघरी व्हायचे. व गौरीची प्रार्थना करायची," सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके/ शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते."

-सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NTTWCX
Similar Posts
‘संस्कृती’ जपणाऱ्या ‘मंगळागौरी’ श्रावण आला की सोबत सणवारांची मोठी पलटणच घेऊन येतो आणि त्यासोबत नवा उत्साहही. मंगळागौरीचं व्रत आणि त्या वेळी खेळले जाणारे खेळ हादेखील असाच एक उत्साहाचा स्रोत. आपल्या मराठी संस्कृतीचा हा मोठा ठेवा तर आहेच, पण दुसरीकडे महिलांचं शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य राखण्याचं कामही हे खेळ करतात. बदलत्या काळानुसार
जानवे म्हणजे नेमके काय? ◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो ◆दुसर्‍यावर अग्नी असतो ◆तिसर्‍यावर नवनाग असतो ◆चौथ्यावर सोम
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते
महर्षी अरविंद यांचे अजरामर महाकाव्य - सावित्री महर्षी अरविंद (१५ ऑगस्ट १८७२ ते पाच डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. अनेक वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language